कंसाची घाबरगुंडी
कंसाची घाबरगुंडी -
कृष्ण-बलरामाच्या पराक्रमाच्या गोष्टी कंसाला कळत होत्या. त्यांचे पराक्रम ऐकून तो मनातून अतिशय घाबरला होता.तेव्हाच कंसाला कळले की, कृष्ण हा नंदाचा मुलगा नसून वसुदेवाचाच आठवा मुलगा आहे. हे कळल्यावर कंस अधिकच भयभीत झाला, म्हणून त्याने वसुदेवाला पुन्हा कैदेत टाकलं.
काहीही करून कृष्णाचा नाश कसा करावा याचा तो विचार करू लागला.
शेवटी त्याने ठरविले की, कृष्ण व बलराम यांना कुस्त्या पाहण्यासाठी बोलवावं आणि त्यांचा आपल्या पहिलवानांकडून नाश करावा.
कंसाने अक्रुर नावाच्या सरदाराला बोलावले व म्हणाला, “अक्रुरा, तू गोकुळात जा व कृष्णाला व बलरामाला येथे घेऊन ये. ते दोघेही मल्लविद्येत पटाईत आहेत. आपल्याकडेही मोठे मल्ल आहेत. आपण कुस्त्यांचा मोठा उत्सव करू.
अक्रुर हा कृष्णभक्त होता. कंसाच्या आज्ञेप्रमाणे गोकुळात जाण्याच ठरवलं.
कंसाला वाटत होत की, कृष्ण हा आपला शत्रू आहे. त्याला मथुरेत येण्याआधीच संपवावं. तेव्हा अक्रुर गोकुळात जाण्यापूर्वीच कृष्णाचा नाश करण्याचे त्याने ठरविले.
कंसाचा केशी नावाचा एक पराक्रमी भाऊ होता. त्याच्याकडे कृष्णाला मारण्याची कामगिरी त्याने सोपविली.
केशी लगेचच एका मस्तवाल घोडयावर बसून गोकुळात गेला. तेव्हा कृष्ण आपल्या सवंगडयांसह गाईवासरं घेऊन वनात जात होता, केशीने त्यांना वाटेतच गाठलं. कृष्णाचे सवंगडी घाबरून गेले व कृष्णाला म्हणाले, “तू त्या भयंकर घोडयाच्या वाटेला जाऊ नकोस.”
तो घोडा कृष्णावर धावून आला. कृष्णाने त्याच्या तोंडावर असा जोरात फटका मारला की तो घोडा धडपडून खाली पडला. त्याच्यावर स्वार झालेला केशी खूप जोराने खाली आपटला व तत्काळ मरण पावला. घोडयाला एक-दोन फटके मारताच तोही तडफडून मेला.
कृष्णाने केलेला हा पराक्रम पाहून सगळया गोपालांस आनंद झाला. त्यांनी सर्वांनी कृष्णाचा जयजयकार केला.
No comments:
Post a Comment