Monday, 28 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक:२०
उपक्रम: कथा क्रमांक:१९
२. शहाणपणाने केलेली मोजणी
अकबराने दरबारात एकदा एक प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले.जेव्हा सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हा बिरबल आला आणि त्याने विचारले "हे काय प्रकरण आहे?"तेव्हा त्यांनी बिरबलाला प्रश्न सांगितला,"शहरात किती कावळे आहेत?"बिरबल हसला आणि अकबराकडे गेला, आणि घोषित केले की त्याच्या प्रश्नाचे उत्तर आहे,"एकवीस हजार पाचशे तेवीस"अकबराने बिरबलाला विचारले,"तुला उत्तर कसे ठाऊक?"बिरबलाने उत्तर दिले, "तुमच्या शिपायांना कावळे मोजण्यास सांगा, जर जास्त असतील तर कावळ्यांचे नातेवाईक शहराबाहेरून त्यांना भेटायला आले असतील आणि जर कमी असतील तर शहरातले कावळे नातेवाईकांना भेटायला शहराबाहेर गेले असतील."बिरबलाच्या उत्तरावर खूष होऊन अकबराने बिरबलाला गळ्यातील मोत्याची माळ भेट दिली.
उपक्रम: कथा क्रमांक:१८
कथा :१८ सुयांचे झाड
एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे.एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला.झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन"मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.”झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली.
तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.
Thursday, 24 September 2020
उपक्रम : कथा क्रमांक-१७
उपक्रम कथा क्रं-१७ घामाचा पैसा.
घामाचा पैसा.
एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला.
शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.
अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.
हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली.
तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
Wednesday, 23 September 2020
उपक्रम : कथा क्रमांक.१६
उपक्रम कथा क्रं.१६ सशाची युक्ती.
सशाची युक्ती.
एका जंगलात भासुरक नावाचा सिंह खूप शक्तिमान असल्याने गर्वाने फुगला होता. रोज भासुरक त्याच्या मनाला वाटेल तितकी जनावरे मारून खायचा. भासुरकाच्या अशा आततायी कृत्यामुळे जंगलात एकही प्राणी शिल्लक रहाणार नाही अशी भीती जंगलातल्या सर्व जनावरांना वाटू लागली.
म्हणून जंगलातले सर्व प्राणी भासुरकाकडे गेले. सर्व प्राण्यांनी भासुरकाला विनंती केली, ''महाराज आपली गरज फक्त एकाच प्राण्यापुरती असताना आपण दररोज आम्हां गरीब प्राण्यांचा का प्राण घेता? आजपासून तुम्ही इथेच बसा. आम्ही जंगलातल्या एकेका जनावराची पाळी भोजनासाठी लावतो. त्यामुळे आपली भूकही शमेल आणि विनाकारण होणारा संहारही थांबेल.''
भासुरक सिंहाला प्राण्यांचे बोलणे पटले. पण त्याबरोबरच त्याने सर्व प्राण्यांना इशारा दिला की, ''मला बसल्या जागी एक प्राणी खायला मिळाला तरमला दुसरं काही नको पण लक्षात ठेवा, एक दिवस जरी यात खंड पडला तरी सर्वांना ठार करीन.''
सर्व प्राण्यांनी भासुरकाचा इशारा लक्षात ठेवून एकेक प्राणी भासुरकाकडे पाठवण्यास सुरुवात केली. प्रथम प्रथम म्हातारे ,जगण्याला कंटाळलेले, दु:खी-कष्टी प्राणी पाठवले पण नंतर चांगले धष्टपुष्ट प्राणी बळी म्हणून जाऊ लागले. तेव्हा विचार करण्याची पाळी जंगलातल्या प्राण्यांवर आली.
त्याचवेळी एकदा एका सशावर पाळी आली. ससा भासुरकाकडे जात असताना विचार करत होता की, ''आपल्यातला एक प्राणी बळी जातो आहे त्यापेक्षा सिंहालाच ठार मारले तर... पण कसं शक्य आहे?'' तेवढ्यात त्याला रस्त्यात एक विहिरीत सहज वाकून बघतो. तेव्हा त्याचे प्रतिबिंब विहिरीत दिसते. ते बघून त्याच्या डोक्यात कल्पना येते की सिंहाला ठार मारायला ही युक्ती वापरू. संध्याकाळी उशिरापर्यंत वेळ काढून मग सिंहाकडे ससा गेला
रोजची भुकेची वेळ होऊन गेल्याने सिंह चांगलाच भुकेलेला होता. ससा आलेला बघताच भासुरक सिंह खवळतो, ''अरे ससुर्ड्या...होतास कुठे तू? एक तर माझ्या घासालाही तू पुरणार नाहीस त्यात उशिराने आलास... थांब आधी तुला खातोच मग जंगलातल्या सर्व प्राण्यांना खातो.''
ससा घाबरतो पण धीर करून बोलतो, ''महाराज, मला वेळ झाला त्याला मीच नव्हे तर जंगलातले इतर प्राणीही जबाबदार नाहीत.'' तुला वेळ होण्याचं कारण काय? सिंह आणखीनच चवताळतो.
''महाराज, ठरल्याप्रमाणेच मी येत होतो. पण रस्त्यात एका गुहेतून एक सिंह माझ्यासमोर आला. मला धमकावीत विचारलं, ''कुठं चाललास? तेव्हा मी सांगितलं की आमचे भासुरक सिंह महाराजाकहे चाललोय!'' तेव्हा मला म्हणाला, ''कोण कुठला भासुरक म्हणे महाराज. एख नंबरचा चोर, त्याला आण बोलावून नाहीतर जंगलातल्या सर्व प्राण्यांना मी ठार करीन. शेवटी मीच राजा आहे ह्या जंगलाचा!'' सशाचे बोलणे ऐकताच भासुरक चवताळला, ''तो दरोडेखोर सिंह राहतो कुठ दाखव मला...आजच्या आज त्याला ठार मारून टाकतो.''
ससा उत्तरतो, ''पण महाराज त्याची गुहा अत्यंत अडचणीच्या जागी असून आपणास त्रास व्हायचा.'' सिंह रागाने लाला होऊन उद्गारतो, ''तुला काय करायचंय... आताच्या आता त्याचा फडशा पाडतो बघ.'' ससा सिंहाला घेऊन त्या विहिरीजवळ जातो. आत वाकून बघत सिंहाला सांगतो, ''तुम्हाला आल्याचं बघून लपलेला दिसतोय.''
तेव्हा भासुरक सिंह स्वत: विहिरीच्या तोंडातून वाकून बघतो. तेव्हा स्वत:चे प्रतिबिंब बघून भासुरक मोठी गर्जना करतो. त्या गर्जनेचा प्रतिध्वनी विहिरीतून आल्याने भासुरक चिडून विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात बुडून मरतो. ताबडतोब ससा आपल्या सर्व प्राणिमित्रांना ही गोष्ट कळवतो आणि सर्व प्राणी खूष होतात.
तात्पर्य: शक्तिपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते.
उपक्रम :कथा क्रमांक-१५
उपक्रम कथा क्रं-१५ उंटाचा अतिशहाणपणा
उंटाचा अतिशहाणपणा.
एका गावातील सुताराने सुतारकाम येत नसल्याने उपजीविकेसाठी एक उंटिण खरेदी केली. नंतर त्या उंटिणीला एक पोर झालं. कौतुकाने सुताराने त्या पोराच्या गळ्यात घंटा बांधली. काही दिवसांनी उंटाचा व्यापार करण्यासाठी सुताराने आणखी उंट खरेदी केले. त्या व्यापारात सुताराचे बस्तान चांगले बसते. गळ्यात घंटा बांधलेला उंट सुताराचा लाडका असतो.
पण हा उंट बाहेर चरताना कळपाबरोबर न राहता रमत गमत एकटा फिरायचा. तेव्हा बाकीच्या उंटांना वाटे की हा जंगलात असा एकटा फिरतो तर एखाद्या दिवशी वाघ-सिंह त्याला पकडतील. पण त्या उंटाने त्याकडे दुर्लक्ष केले.
एके दिवशी सर्व उंट चरून घरी परतले तरी हा उंट जंगलातच रेंगाळत होता. त्याचवेळी एका सिंहाने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्या गळ्यातील घंटेमुळे हा उंट लक्षात येई. त्या दिवशी काळोखात उंट वाट चुकला. पण सिंहाने घंटेच्या आवाजावरून अंदाज घेऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकले.
तात्पर्य: शहाणपणाच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केले तर जीवावर संकट येऊ शकते.
Monday, 21 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक- १४
उपक्रम कथा क्रं- १४ दानाचे मोल.
दानाचे मोल.
राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्या शेतकर्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.
दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे ? फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का ? राजांना नावं ठेवतोस ? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटंच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील ? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करुन घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला.
Sunday, 20 September 2020
उपक्रम : कथा क्रमांक-१३
उपक्रम कथा क्रं-१३ ईश्वराचे अस्तित्व.
ईश्वराचे अस्तित्व.
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्या देवतांना बोलाविले व विचारले, माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात. सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा ?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला ! त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की, तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.
Saturday, 19 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक-१२
उपक्रम कथा क्रं-१२ नैतिकतेचा आदर्श.
नैतिकतेचा आदर्श.
आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च दर्या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस अर्पण करु ?
महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.
ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या शेतकर्याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.
Friday, 18 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक-११
उपक्रम कथा क्रं-११ ससा आणि कासव.
ससा आणि कासव.
एका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवासमोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.
कासव म्हणाले, ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल, तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्याआधी तू तिथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईल आणि जर मी आधी पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल आहे कबूल?
सस्याने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले. थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपलया गतीने चालले होते.
कासव खूपच मागे राहिलेले बघून सस्याने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहे. थोडावेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे. म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू.
एखादे वेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यातच आपण त्याच्या पुढे जाऊ, असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.
कासव मंद गतीने चालत चालत सश्याच्या पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच होता. सश्याला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले, तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली.उपक्रम कथा क्रं-११ ससा आणि कासव.
ससा आणि कासव.
एका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवासमोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.
कासव म्हणाले, ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल, तर चल माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्याआधी तू तिथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईल आणि जर मी आधी पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल आहे कबूल?
सस्याने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले. थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव मात्र आपलया गतीने चालले होते.
कासव खूपच मागे राहिलेले बघून सस्याने विचार केला, कासव अजून बराच मागे आहे. आपणही धावून दमलो आहे. थोडावेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे. म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू.
एखादे वेळी कासव थोडे पुढे जरी निघून गेला तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यातच आपण त्याच्या पुढे जाऊ, असा विचार करत ससा झाडाखाली सावलीत झोपी गेला. थोड्याच वेळात तो घोरू लागला.
कासव मंद गतीने चालत चालत सश्याच्या पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच होता. सश्याला जाग आली तेव्हा पाहतो तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले, तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली.
Thursday, 17 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक-१०
उपक्रम कथा क्रं-१० पावसाचा थेंब.
उपक्रम कथा क्रं-१० पावसाचा थेंब.
पावसाचा थेंब
ढगातून गळून पडलेल्या एका पावसाच्या थेंबाने आपल्या नशीबाविषयी जोरात कुरकुर केली. तो म्हणाला, ‘माझं जीवन किती निरुपयोगी आहे. आता माझा अंत होणार ! मी कोणालाही माहीत नाही, मी काही केलं नाही. मला आकाशातून हाकलून दिलं आहे. मी मुळी जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं ?’
तो थेंब नशिबाने एका शिंपल्यात पडला व लगेच ते शिंपले मिटले. पुढे कित्येक वर्षांनी त्या शिंपल्यातून एक अति मौल्यवान मोती निघाला व पावसाच्या थेंबाचा बादशहाच्या मुकुटात शोभणारा मोती बनला.
तात्पर्य: हलक्या कुळात जन्म घेतलेला माणूस स्वतःच्या तेजाने मोठेपणा मिळवतो.
Wednesday, 16 September 2020
उपक्रम : कथा क्रमांक-९
उपक्रम कथा क्रं-९ रानटी व गावठी हंस.
रानटी व गावठी हंस
एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले. जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे.
त्या कळपातील हंसांना या गावठी हंसांशी मैत्री करण्यास पाहिल्याने संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले.
एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले.
ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.
तात्पर्य: जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाऊन राहणे मूर्खपणा होय.
Tuesday, 15 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक-८
उपक्रम कथा क्रं-८ एक भिकारी.
मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी.
एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले.
भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’
भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले.
तात्पर्य- झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.
Monday, 14 September 2020
उपक्रम : कथा क्रमांक-७
उपक्रम कथा क्रं-७ उंदीर, कोंबडा आणि मांजर
उंदीर,कोंबडा आणि मांजर.
एक उंदराचे पिटुकले पिल्लु पाहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडेतिकडे फिरून पुनः बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ‘आई, ज्या या लहानशा जागेत तू मला लहानाचे मोठे केलेस, ती जागा सोडून आज मी अंमळ बाहेर जाऊन आले; तेथे मी जी मौज पाहिली, ती काही विलक्षणच.
रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले; त्यापैकी एक प्राणी फार गडबडया स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबडया रंगाचा तुरा होता.
तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात होतो, इतक्यात त्याने आपले दोन्ही हात हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की, त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.
आता दुसर्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून, त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही.
हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ‘वेडया पोरा ! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिल्याने पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भय वाटले, तो विचारा कोंबडा अगदी निरुद्रची असून, एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोड तरी भाग आपणास मिळण्याचा संभव आहे; पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट लबाड आणि क्रूर मांजर असून, उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.’
तात्पर्य: बाह्य देखावा आणि सौंदर्य यांवरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
Sunday, 13 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक- ६
उपक्रम कथा क्रं- ६
मूर्ख डोमकावळा.
एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले.
'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.
त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली.
तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''
तात्पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.
Saturday, 12 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक-४
उपक्रम कथा क्रं-४ मूर्खांचे निष्कर्ष.
मूर्खांचे निष्कर्ष.
एका ज्योतिष्याने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.'' ज्योतिष्याच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरविले.
पण जमलेल्या काही लोकांपैकी एक जण चिकित्सक होता त्याने त्या ज्योतिष्याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्याने ती दुर्बिण तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना ज्योतिष्याचा मूर्खपणा लक्षात आला.
तात्पर्य-कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये.
तात्पर्य: जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.
उपक्रम: कथा क्रमांक:५
उपक्रम कथा क्रं-५
मनःशांती |
एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते.
विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?
सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, 'तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.'
तात्पर्य-आपण नेहमी पैश्यामागे न धावता स्वतःच्या आरोग्यासाठी,सामाजिक कार्यासाठी वेळ दिला पाहिजे.
लक्ष्मीने विचारले, 'सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.' विष्णू म्हणाले, 'तिचं नाव आहे शांती' जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.
Thursday, 10 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक:३
उपक्रम कथा क्रं - ३
सिंह आणि लांडगा | Lion and wolf
एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला,'' महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा.
मी तुमच्यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले.
त्याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला,'' महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत.
इतक्या सा-या मेंढयामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.'' सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.
तात्पर्य: आपली असहाय्यता लपविण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे.
Wednesday, 9 September 2020
उपक्रम: कथा क्रमांक:२
■■■● कथेचे नाव ●■■■
💎 अस्वल आणि दोन मित्र💎
एकदा दोन चांगले मित्र जंगलातील एकाकी आणि धोकादायक वाटेवरून चालले होते. सूर्य मावळतीला जात असताना त्यांची भीती वाढली पण दोघांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवले.
अचानक त्यांना वाटेत अस्वल दिसले. एकजण पट्कन जवळच्या झाडाकडे पळाला आणि क्षणार्धात झाडावर चढला. दुसऱ्या मुलाला झाडावर चढता येत नव्हते म्हणून तो जमिनीवर मेल्याचे ढोंग घेऊन पडून राहिला.
अस्वल जमिनीवर पडलेल्या मुलाजवळ आले, आणि त्याने त्याला डोक्यापाशी हुंगले. मुलगा मेला आहे असा विचार करून अस्वल त्याचा वाटेने निघून जातो.
झाडावरचा मुलगा खाली उतरला. त्याने मित्राला विचारले,"अस्वलाने तुझा कानात काय सांगितले?"तो उत्तरला,"ज्या मित्रांना तुमची काळजी नसते अशा मित्रांवर विश्वास ठेऊ नका."
तात्पर्य: ●●●●●●●●●
संकटकाळात जो मदत करतो तोच खरा मित्र.
🍁🍁🍁☘️🍁🍁🍁
उपक्रम: कथा क्र:१
उपक्रम कथा क्र-१
अती तेथे माती.
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.
इंद्र त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.
त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.
तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.
Featured post
इयत्ता :नववी, विषय : मराठी व्याकरण वर आधारित ऑनलाइन टेस्ट
https://forms.gle/9NCEE1a3xC145Us17
-
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'* 📱💻🖥️ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्या...
-
अनुभवाच्या जोरावर यश - अनुभवाच्या जोरावर यश - एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-य...
-
अनोखा उपक्रम इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी घडवून आणली परिक्षेपे चर्चा चाय के साथ कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्याल...